संपूर्ण नाव :
जन्म :
डॉ. सुधाकर देशमुख
Dr. Sudhakar Deshmukh
ग्रंथ संपदा :
१) राष्ट्र आणि राष्ट्रवाद
राष्ट्र आणि राष्ट्रवाद या संकल्पनांचे संपूर्ण आकलन होण्यासाठी केवळ राज्यशास्त्रीय संदर्भ सांगणे पुरेसे नाही याची जाणीव डॉ. सुधाकर देशमुख यांना असल्यामुळे जगामध्ये जे जे वैचारिक मंथन आजपर्यंत झाले, ह्यामधील जीवनाच्या विविध क्षेत्रांतील विचारधारांचा मागोवा त्यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विविध विषयांचा सखोल अभ्यास करून डॉ. देशमुख यांनी राष्ट्र आणि राष्ट्रवादाची संकल्पना विषद केली आहे. गेल्या दोनशे वर्षांत ही संकल्पना कशी बदलत व विकसित होत गेली याची मांडणी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली आहे. मानवतावाद हे उच्च प्रतीचे ध्येय आहे. त्याकरिता राष्ट्रनिष्ठ मानवता आणि मानवतानिष्ठ राष्ट्रीयत्व या दोन मनोवृत्तींच्या विकासाची गरज आहे; हे या विद्वत्तापूर्ण आणि ध्येयवादी भूमिकेतून लिहिलेल्या ग्रंथाचे भरतवाक्य आहे.
डॉ. सुधाकर देशमुख : एका व्रतस्त लेखकाचा देहांत
श्रीकांत अनंत उमरीकर,
जनशक्ती वाचक चळवळ,
औरंगाबाद 9422878575.
उरूस, दै. पुण्यनगरी, 23 मे 2016
अगदी चित्रपटात कथा कादंबर्यात शोभावा असा प्रसंग आहे. लेखक आजारी आहे. आपला अंत जवळ आला याची त्याला पूर्ण कल्पना आहे. त्याची वाचाही बंद झाली आहे. त्याने अत्यंत मेहनत घेऊन लिहीलेले पुस्तक त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशीत व्हावे म्हणून त्याचे मित्र, नातेवाईक, अक्षर जूळणी करणारे, मुद्रक, प्रकाशक, चित्रकार सगळे झटत आहेत. शेवटी पूस्तक पूर्ण होते. लेखकाच्या हातात त्याची प्रत पडते. एक अतिशय छोटा घरगुती प्रकाशन समारंभ आयोजित केल्या जातो. पुस्तक प्रकाशनासाठी लेखकाला जेमतेम उभे राहता येते. फोटो काढले जातात. लगेच लेखकाला पलंगावर झोपवले जाते. कार्यक्रम आटोपतो. लेखकाला शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात नेले जाते. शस्त्रक्रिया होवू शकत नाही कारण लेखक कोमात गेलेला असतो. परदेशातील मुलगा व जावई येण्याची वाट पाहत व्हेंटीलेटरवर त्याला कृत्रिमरित्या जगवले जाते. सर्व नातेवाईक आले की हा कृत्रिम आधार काढून घेतला जातो. लेखकाने तर पुस्तक प्रकाशन झालेच तेंव्हाच मनोमन शेवटचा श्वास घेतला जातो.
हा चित्रपटातील प्रसंग नाही. 16 मे ला औरंगाबाद शहरात खरोखरच घडलेला प्रसंग आहे. उद्गीर येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर देशमुख त्यांच्या उतारवयात साठीनंतर लेखनाकडे वळले. महत्वाची 6 पुस्तके लिहील्यानंतर आपल्याला आयुष्याची शेवटची काही वर्षे उरली आहेत हे त्यांना एक वैद्यक व्यवसायी म्हणून लक्षात आले. कारण त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. ‘प्रतिभा आणि सर्जनशिलता’ या शेवटच्या पुस्तकावर ते काम करत होते. हे पुस्तक आपल्या डोळ्यासमोर पुर्ण व्हावे ही त्यांची तीव्र इच्छा. केवळ त्यासाठीच ते कर्करोगाशी प्राणपणाने जिद्दीने लढत होते. पद्मगंधा प्रकाशनाच्या अरूण जाखडे यांनी या 450 पानी पुस्तकाचे काम तातडीने पुर्ण केले. 16 मे रोजी या पुस्तकाच्या प्रती घेवून अरूण जाखडे औरंगाबादला आले. देशमुख कुटूंबियांनी छोटासा प्रकाशन समारंभ घडवून आणला. ज्येष्ठ समिक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते व न्यायमुर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत झाले. आणि लगेच देशमुख काकांची तब्येत ढासळली. चोवीस तासात त्यांची जीवन ज्योत मालवली. जणू या एका पुस्तकासाठीच त्यांनी आपले श्वास रोकून ठेवले होते.
सुधाकर देशमुख हे उदगीर शहरातील नामांकित शल्यचिकित्सक. त्यांनी सामाजिक कामात मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. आपल्या मित्रांच्या साथीने रक्तपेढी, नागरी सहकारी बँक, साहित्य परिषदेची उद्गीरची शाखा, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून उद्गीरसारख्या महाराष्ट्राच्या टोकाला कर्नाटकाच्या सीमेवरील गावात सामाजिक सांस्कृतिक वातावरण रसरशीत ठेवले. पण त्यांच्या माघारी त्यांचे शिल्लक राहणारे मोठे योगदान म्हणजे त्यांनी उतारवयात केलेले लेखन.
‘राष्ट्र आणि राष्ट्रवाद’ हे त्यांचे 2009 साली आलेले पहिले पुस्तक. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला. ज्येष्ठ समाजवादी नेते ग.प्र.प्रधान यांची मोठी प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. प्रधान सरांनी लिहीले आहे, ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन टोकाच्या भूमिका मानल्या जाऊ नयेत ही या विचारवंतांची भूमिका सुयोग्य आहे.’ देशमुखांनी किती महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे हे प्रधानांच्या अजून एका वाक्यातून लक्षात येते. ‘राष्ट्रवाद आणि साम्यवाद या दोन्ही संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झाल्या. मार्क्सवाद्यांनी राष्ट्रवादाचा नीट विचार केला नाही ही त्यांची मोठी चूक झाली.’ ‘आता विश्वात्मके देवे’ या पसायदानातील ओळींपर्यंत आपल्या या विषयाची व्याप्ती देशमुखांनी नेउन ठेवली आहे. ‘मनावतावाद हे उच्चप्रतीचे ध्येय आहे. त्याकरिता राष्ट्रनिष्ठ मानवता आणि मनावतानिष्ठ राष्ट्रीयत्व या दोन मनोवृत्तींच्या विकासाची गरज आहे.’ असे अतिशय स्पष्ट, ठाम वाक्य लिहून आपल्या या पहिल्या पुस्तकाचा समारोप त्यांनी केला आहे.
‘उद्गीरचा इतिहास’ हे सुधाकर देशमुखांचे दुसरे पुस्तक 2010 मध्ये प्रकाशीत झाले. इ.स.1228 मधील शिलालेखात उदगीरचा उल्लेख कसा आहे इथपासून ते आजतागायतचा धांडोळा देशमुखांनी आपल्या या पुस्तकात चिकित्सक पद्धतीनं घेतला आहे.
‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती’ हे त्यांचे अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे पुस्तक 2013 मध्ये प्रकाशीत झाले. 350 पानांच्या या जाडजुड ग्रंथात विविध पंथांच्या तत्त्वज्ञानाचा, भक्तीचा त्यांनी चिकित्सक अभ्यास रेखाटला आहे. 12 व्या ते 14 व्या शतकातील मुस्लिम धर्मप्रसाराला हिंदू समाजाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे रामायणाचे पुनरूज्जीवन. शेल्डन पॉलॉक आणि बेकर, बी.डी.चटोपाध्याय किंवा रोमिला थापर यांच्या मतांचा अभ्यास करून तो संदर्भ घेवून देशमुख मात्र एकनाथी रामायणाचा आधार घेवून आपला विषय स्पष्ट प्रतिपादन करतात हा त्यांच्या प्रतिभेचा पुरावाच होय. एकनाथांची ओवी त्यांनी दिली आहे, ‘फेडावया देवाची साकडी । स्वधर्मु वाढवाया वाढी । नामे उभारावया मोक्षाची गुढी । सूर्यवंशा गाडी दशा आली॥ यातूनच सुधाकर देशमुख किती सखोल आणि स्वतंत्रपणे अभ्यास करतात हे लक्षात येते.
मराठवाड्याचे दोन भाग पडतात. गोदावरीच्या उत्तरेकडचा भाग ज्याला ‘मुलग’ असे म्हणतात तर गोदावरीच्या दक्षिणेचा भाग ज्याला ‘अश्मक’ असे म्हणतात. या ‘अश्मक’ प्रदेशावर त्यांनी सविस्तर 160 पानांचे पुस्तकच लिहीले आहे. हा प्रदेश, त्याची वैशिष्ट्ये, त्याचा इतिहास भुगोल तर आहेच पण त्यासोबतच याची सांस्कृतिक वैशिष्ट्येही नमुद केली आहेत. दक्षिण मराठवाड्यात आढळणारे कोमटी हे पूर्वाश्रमीचे जैन. ते कर्नाटकातील म्हैसूरचे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्विकार करत वैदिक धर्म स्विकारला. पण मुळ गोमटेश्वर देवतेला विसरले नाहीत. त्यावरून गोमटी- कोमटी असे नाव पडले असावे. रेड्डी मुळचे आंध्रप्रदेशचे. पण त्यांनी या प्रदेशात स्थलांतर केले. परीट समाजात तर मराठा परीट, तेलंगी परीट व वाणी परीट अश्या तीन पोटजातीं कशा आढळतात हे त्यांनी लिहीले आहे. अशी काही महत्त्वाची निरीक्षणे सुधाकर देशमुखांनी नोंदवली आहेत.
‘लातूर जिल्ह्यातील ग्रामनामांचा अभ्यास’ व ‘वीरशैव तत्त्वज्ञान’ ही त्यांची अजून दोन पुस्तके. या पुस्तकांच्या नावांवरूनच त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात येते. लातूर जिल्ह्यातील ग्रामनामांवर 50 टक्के प्रभाव कानडीचा असल्याचे त्यांनी नोंदवले आहे. त्यावरून हा प्रदेश मातृसत्ताक अशा दक्षिणेचाच कसा भाग होता हे सिद्ध होते.
ज्या महत्त्वाच्या पुस्तकाबाबतचा प्रसंग लेखाच्या सुरवातीलाच सांगितला आहे ते ‘प्रतिभा आणि सर्जनशीलता’ हे देशमुखांचे शेवटचे पुस्तक. 450 पानांच्या या महत्त्वाच्या ग्रंथात इंग्रजीत इन्ट्युशन म्हणून ओळखली जाणारी बाब म्हणजे प्रतिभा असे त्यांनी नमूद केले आहे. आधुनिक कालखंडात बुद्धीला अतोनात महत्व आले. माणुस हा तार्किक प्राणी आहे या विधानात फारसा अर्थ नाही असे त्यांनी आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष म्हणून लिहून ठेवले आहे. डॉ. सुधाकर देशमुख लिहीतात, ‘तर्क, बुद्धी यांचे महत्त्व मान्य करूनही माणसाला बुद्धीबरोबर भावनाही असतात, हे आपण विसरतो.भावनांना आपण अतार्किक ठरवून टाकले. वास्तविक भावना-अतार्किकता हा आपला जगण्याच्या प्रश्नाच्या उत्तराचा गाभा आहे.’
अतिशय मोलाचे असे विश्लेषण करून डॉ. सुधाकर देशमुखांनी या जगाचा निरोप घेतला. जवळपास दोन हजार पृष्ठांचा मजकुर त्यांनी या सात पुस्तकांत लिहून ठेवला आहे. पुढीच संशोधकांना अभ्यासकांना वाचकांना खाद्य देवून ठेवले आहे. त्यांच्या डोक्यात अजून प्रचंड विचार चालू होते. त्यांच्या अकस्मिक जाण्याने एक मोठा धक्का सर्वांनाच बसला.
स्वत: मराठीचा-इतिहासाचा-तत्त्वज्ञानाचा-राज्यशास्त्राचा प्राध्यापक नसलेला हा माणूस त्या विषयातील इतके प्रचंड लिखाण करतो. त्या त्या क्षेत्रातील माणसांना लाज वाटावी असेच हे काम आहे. बोरकरांच्या मोठ्या सुंदर ओळी आहे
देखणा देहांत तो जो सागरी सुर्यास्तसा
अग्नीचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा
मनातील काम पुर्ण करून देह ठेवलेल्या या व्रतस्त लेखकाला विनम्र श्रद्धांजली.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.